भुसावळ (प्रतिनिधी ) – :
तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील जय लक्ष्मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन, मुलुंड (मुंबई) या संस्थेतर्फे आयोजित कॅरी वेअर, रायटिंग, स्केचिंग, कलरिंग, ग्रीटिंग कार्ड आदी विविध विषयांवरील स्पर्धांमध्ये सहभागी होत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ज्याप्रमाणे चित्रकलेत विविध रंग भरून सुंदर कलाकृती साकारली जाते, त्याचप्रमाणे जीवनात संस्कृती, विचार, धार्मिकता व जीवनमूल्यांचे रंग भरून जीवन समृद्ध केले पाहिजे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष व जिल्हा सचिव तसेच नाहाटा महाविद्यालयाच्या ख्यातनाम प्राध्यापिका प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. जय लक्ष्मी क्लासेसने उज्वल यशाची परंपरा कायम राखत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटविल्याचे त्यांनी गौरवोदगार काढले. विद्यार्थी हा मातीच्या गोळ्यासारखा असून शिक्षकांनी योग्य आकार देऊन त्याला घडवावे, असेही त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत श्रेयस बबलू भगत, देवेश नंदू काकडे, तमन्ना महावीर वैष्णव यांनी सुवर्णपदक, हितेश नंदू काकडे यांनी रजत पदक, तर देवेश नंदू काकडे, राज अतुल पाटील व प्रियंक जीवन छाजेड यांनी कांस्य पदक पटकावले. या यशामुळे संबंधित विद्यार्थ्यांना रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका निवेदिता किरण ठाकरे यांनी मेहनतीने घडविले, तर ममता मुकेश महाजन व अनिल भैयालाल हरणे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळाल्याचा आनंद व्यक्त करत भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे संचालिका पुनम विजय फालक यांनी सांगितले. तसेच संचालक जय फालक व लावण्या फालक यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात येत आहे.
या यशाबद्दल गावातील विविध मान्यवरांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच जय लक्ष्मी क्लासेसचे अभिनंदन करण्यात येत आहे.


