भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने मतमोजणीची तयारी जोमात सुरू असून, दिनांक 29 नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये साहित्य वाटप, मतमोजणी प्रक्रिया, जबाबदाऱ्या आणि सुयोग्य समन्वयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतमोजणीसाठी एकूण १९ टेबलांवर साहित्य वाटप करण्यात येणार असून, प्रत्येक टेबलवर २ कर्मचारी आणि २ शिपाई नियुक्त करण्यात येणार आहेत. सकाळी ७ वाजता साहित्य वाटप सुरू होणार असून, साहित्य स्वीकारताना केंद्रप्रमुखांनी सर्व साहित्य नीट तपासण्याचे निर्देश देण्यात आले.
मतदानादरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी मास्टर ट्रेनर टीम उपलब्ध राहणार आहे.
मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडणार असून, यासाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यक अशा पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
मतमोजणी दिवशी अधिकारी-कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी डी.एस. ग्राउंडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोनचा वापर पूर्णतः बंद असणार आहे.
या प्रशिक्षणावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राजेंद्र फातले, नायब तहसीलदार प्रफुल कांबळी, तसेच मंडल अधिकारी मंगेश परिसे उपस्थित होते.
भुसावळमध्ये सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध मतमोजणी पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.



