भुसावळ (प्रतिनिधी ) -: कटकारस्थान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही लोकांनी फोडला. शरद पवार साहेबांनी अनेकांना मोठं केलं होतं ते लोक सत्तेच्या लालसेपोटी पळून गेले. मात्र, जे काही निष्ठावंत राहिले त्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा नामोल्लेख आवर्जून करावा लागेल. कुणी कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी हा माणूस मैदान सोडणारा नाही तर लढणारा आहे. राज्याचे केबिनेट मंत्र्याच्या घरात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपने दिली आहे. तरीही त्यांना जोर लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा घ्यावी लागते. यावरून संतोष चौधरी व खडसेंच्या ताकदीचा अंदाज येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भुसावळात जाहीर प्रचार सभेत नमूद केले आहे.

भुसावळच्या गडकरी नगरात संभाजी राजे चौकात ही प्रचार सभा झाली. विधानसभेत प्रचंड आक्रमक भूमिका मांडणारे संतोष चौधरी आम्ही पाहिले आहेत. त्यांना कुणी हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. कुणी कितीही कल्ला केला तरी ‘झुकेगा नही….’ या पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगची आठवण करून देणारा हा माणूस आहे. शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे. चौधरी व खडसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भुसावळला सर्वसामान्य कुटुंबातील गायत्री भंगाळे या लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली. तीला कुठलाही राजकीय वारसा नाही. खरं सांगायचं झालं तर हा लोकलढा आहे भुसावळ येथील भाजपच्या घराणेशाही विरोधात. असेही शिंदे म्हणाले. मंचावर ज्येष्ठनेते आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
भुसावळ पालिकेत भाजप ठेकेदारांची पार्टी
भुसावळ पालिकेत भाजपचे बहुतांश नगरसेवक हे ठेकेदार आहेत. विकास कामांची गुणवत्ता न राखता मलिदा लाटणे हाच त्यांचा धंदा झाला आहे. विधानसभेत फायदा व्हावा म्हणून निवडणुकीच्या आधी रस्ते करण्याचा घाट घातला गेला. आता अमृत योजनेसाठी हे कोट्यवधी रुपयांचे रस्ते फोडले जाणार आहेत. वस्तुस्थिती माहिती असतानाही केवळ पैसा कमावण्यासाठी ही कामे केली गेली असे खळबळजनक आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केले. हाच मुद्दा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही मांडला.
भाजपचा फाजील आत्मविश्वास, बेताल वक्तव्य
भाजपला सत्तेची गुर्मी आणि फाजील आत्मविश्वास आहे. वाटेल तसे त्यांचे नेते रडतात. ‘राज्याच्या तिजोरीच्या चाब्या आमच्या ताब्यात आहेत. पालिकेची सत्ता दिली नाही तर निधी मिळणार नाही. अशी धमकी मतदारांना जाहीरपणे दिली जाते आहे. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खुन होतो आहे. पण तरीही निवडणूक आयोगाने धृतराष्ट्री भूमिका घेतली आहे. भाजप आपले उमेदवार हे बिनविरोध व्हावे म्हणून धमकी देऊन बळजबरीने इतर पक्षांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावतात तरी कारवाई होत नाही. म्हणून हे चित्र पाहिल्यावर ‘उडता महाराष्ट्र’ असं नाईलाजाने म्हणावे लागते आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सभेत नमूद केले.
‘छावा’ चित्रपटाचा डायलॉग ऐकवला
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भुसावळच्या गडकरी नगरात संभाजी राजे चौकात ‘छावा’ चित्रपटातील ‘हाती, घोडे, तोफ, तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सबपें भारी हैं’ हा डायलॉग ऐकवला. त्यानंतर प्रचंड टाळ्या पडल्या. हाच धागा पकडून जनाधार याला म्हणतात अशा शब्दांत संतोष चौधरींचे त्यांनी कौतुक केले.
ज्यांनी मोठं केलं त्यांच्या डोक्यावर नाचू नका
भुसावळचे सध्या जे मंत्री महाशय आहेत ते आधी कोण होते, कुठे काय काम करायचे, त्यांची आवक किती हे लोकांना माहिती आहे. मी आणि नाथाभाऊंनी त्यांना मोठं केलं. आता हे महाशय आमच्या डोक्यावर नाचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, डोक्यावरून खांद्यावर आणि जिमिनीवर कसं आपटता येते हे मतदार दाखवून देतील. ज्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत डिपाॅझिट भरायला व ओवाळणी टाकायला पैसे नव्हते ते आज पैशाची मस्ती दाखवू लागले आहेत. आम्हाला (खडसे आणि चौधरी) बघून घेण्याची भाषा करताहेत. ही मस्ती आली कुठून? असा प्रश्न माजी आमदार संतोष चौधरी यांनी सावकारेंचा थेट उल्लेख न करता उपस्थित केला.


