वरणगावातील पत्रकार सुनील पाचपोळ यांचे आकस्मिक निधन :

वरणगाव (प्रतिनिधी ) – येथील पत्रकार सुनील पाचपोळ ( वय ५०) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे स्थानिक पत्रकारितेत काम केले असुन समाजातील विविध समस्यांकडे उजेड टाकणाऱ्या बातम्या मांडण्यात ते अग्रेसर राहिले. वरणगावातील एजेएस चॅनेलचे पत्रकार सुनील पाचपोळ ( रा . आडोळ ता . जळगाव जामोद ह . मु . रेणुका नगर वरणगाव हे प्रामाणिक, निष्ठावंत आणि पीसामाजिक दृष्टिकोनातून संवेदनशील पत्रकार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कामामुळे स्थानिक प्रशासनासमोरील अनेक समस्यांवर प्रकाश पडला आणि समाजातील अनेक आवाजांना व्यासपीठ मिळाले.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबासह मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील पाचपोळ यांच्या निधनामुळे स्थानिक माध्यमसृष्टीत एक मोठी रिक्त जागा निर्माण झाली असून सर्व स्तरातून त्यांना आदरांजली अर्पित केली जात आहे. त्यांच्या कामाची आठवण आणि समाजासाठी केलेले योगदान सदैव स्मरणात राहणार आहे . असे आपल्या पत्रकारीताचा ठसा उमटवून वरणगाव शहर व परिसरातील नागरीकांच्या मनात स्थान निर्माण करणारे पत्रकार सुनिल पाचपोळ यांना व्हॉईस ऑफ मिडिया भुसावळ व वरणगाव शहर पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली .