भुसावळ ( उज्वला बागुल ) : राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. अर्थात, म्हणूनच भुसावळ पालिका निवडणूक अतिशय हाॅट ठरणार असल्याचे संकेत मिळताहेत. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. हीच संधी साधून मंत्री सावकारेनी आपल्या साैभाग्यवतीला नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांना चक्रव्युवहात घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संताेष चाैधरी व आमदार एकनाथ खडसे यांनी रणनिती आखण्याचे काम सुरू केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत लढण्याचा उत्साह निर्माण व्हावा म्हणून संताेष चाैधरी यांनी मंत्री सावकारेंचा हुकमी एक्का असलेल्या राजेंद्र आवटेंच्या प्रभाग क्रमांक चाैदामध्ये सुपूत्र जयेश चाैधरीला रिंगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे. कारण जयेश चौधरीनी पत्रकारपरिषद घेऊन तसे स्पष्ट संकेत स्वत: दिले आहेत.

जयेश चाैधरी उत्कृष्ट संवादपटू
भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश चाैधरीनी नुकतीच पत्रकारपरिषद घेतली. त्यात त्याने आपण प्रभाग क्रमांक १४मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याची मनिषा बाेलून दाखवली. इतकेच नव्हे तर भविष्यातील व्हीजनही काही अंशी स्पष्ट केले. साफसफाई, चुकीच्या पद्धतीने झालेली विकासकामांवर त्यानी बाेट ठेवले आहे. याचाच अर्थ ठेकेदार झालेल्या नगरसेवकांचं पितळ उघडं करण्याचे मिशनच त्यांनी हाती घेतलं असल्याचं हे द्याेतक म्हणावे लागेल. अस्खलित हिंदी आणि मराठी या दाेन्ही भाषात जयेशने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. त्याचा हा व्हीडीओ शहरात प्रचंड व्हायरल हाेताे आहे. संताेष चाैधरींचा अभ्यासू वारसदार अशा प्रतिक्रियाही शहरवासी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त करू लागले आहेत. चाैधरीचा रहिवास असलेल्या शनिमंदिर वाॅर्डातूनही त्यांचे थाेरले सुपूत्र सचिन चाैधरी रिंगणात उतरू शकतात अशी अटकळ बांधली जाते आहे.
मुकेश गुंजाळाचा उल्लेख महत्त्वाचा
माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘तुमच्यासाेबत आणखी दुसरा जाेडीदार प्रभाग क्रमांक १४मध्ये काेण राहणार?’ असा प्रश्न विचारल्यावर जयेश चौधरी म्हणाले की, ‘या प्रभागात सर्वच लाेक माझे आहेत. माझ्यावर व आमच्या कुटुंबावर निस्सीम प्रेम करणारे आहेत. मात्र, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांची माेलाची साथ लाभते आहे. ते आणि त्यांची टीम ताकदीने कामाला लागली आहे. मात्र, माझ्या साेबत नेमकं या प्रभागात काेण असेल हे पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळीच सांगू शकतील.’ अस सांगून प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि राजकीय समज असल्याचा प्रत्येय त्याच्या बाेलण्यातून आला. राजकीय पटलावर भले जयेशचे वय कमी असेल हे मान्य. पण त्याला असलेली समज ही पाेक्त राजकारण्यांनाही लाजवणारी आहे.
८० टक्के युवकांना मविआचे तिकिट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस अशी महाविकास आघाडी भुसावळ पालिका निवडणुकीत राहील असे चित्र सध्या तरी दिसते आहे. त्यात माजी आमदार संताेष चाैधरी यांनी ८० टक्के उमेदवार हे तरुण असतील असे आधीत घाेषित केले आहे. त्यामुळे याच वयाेगटातील उमेदवारांचा ओढा मविआकडे अधिक असल्याचे ध्वनीत हाेते आहे. या अनुषगाने अनेक जण कामाला लागले आहेत. साेशल मीडियावर प्रचार-प्रसारही त्यांनी सुरू केला आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे नेते अनिल चाैधरी यांनीही अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. ते ऐनवेळी काेणती खेळी खेळतात? याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.


