भुसावळात आज घुमणार शिवसेनेच्या वाघांची डरकाळी! रणसंग्राम पालिकेचा : खान्देशची मुलुख मैदानी ताेफ मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रकांत साेनवणेंच्या उपस्थितीत मेळावा

भुसावळ (उज्वला बागुल ) – जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचा गड म्हणून कधी काळी भुसावळ शहर व तालुका ओळखला जायचा. मात्र, कालाैघात घडलेल्या राजकीय घडामाेडींमुळे हे चित्र बदलले आहे. अलिकडे तर शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशा दाेन गटात दुभंगली आहे. यापैकी शिवसेना शिंदे गटाने आता भुसावळात अधिक लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ५ वाजता संताेषी माता हाॅल येथे जाहीर तालुका मेळावा हाेताे आहे. खान्देशची मुलुख मैदानी ताेफ मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चाेपड्याचे आमदार चंद्रकांत साेनवणे या ‘त्रिनेत्रां’ची उपस्थिती लाभणार आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप महायुतीचे सरकार आहे. मात्र, असे असले तरी इथे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात फारसे सख्य नाही. वर्तमान परिस्थितीत वरचढ हाेत असलेला भाजप शिंदे गटाला किती महत्व देताे यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. हाच धागा पकडून शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात नेतेमंडळी आपल्या भात्यातील काेणते बाण बाहेर काढतात याची भुसावळकरांना उत्सुकता आहे.

जिल्हाप्रमुख मवाळ, कार्यकर्ते जहाल
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांचा पिंड मुळात अध्यापनाचा. मात्र, तरीही ते सक्रीय राजकारणात वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांचा स्वभाव या पक्षाला साजेसा नाही. म्हणजेच ते मवाळ स्वभावाचे आहेत. विराेधकांना त्यांनी कधी शिंगावर घेतल्याचे आठवत नाहीत. दुसरीकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते मात्र, प्रचंड जहाल आहेत. या दाेघांची माेट बांधण्याचा प्रयत्न आता वरिष्ठ स्तरावरून केला जाताे आहे. ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, भुसावळ विधानसभा क्षेत्रप्रमुख संताेष माळी, भुसावळ शहरप्रमुख पवन नाले, तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, युवा सेना जिल्हाप्रमुख पवन भाेळे, भुसावळ शहरप्रमुख दीपाली बऱ्हाटे, वरणगाव शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला शहरप्रमुख श्रद्धा गायकवाड, माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी संघटन आणखी मजबुत करण्याच्या उद्देशाने कंबर कसली आहे.

महायुती झाली तर समान जागा वाटपाचे सूत्र
भुसावळ पालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिन्ही पक्षांची महायुती झाली तर जागा वाटपाचे सूत्र समान जागा असे राहू शकते. तसे झाले तरच महायुती हाेणे शक्य आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या तरी तिन्ही पक्षांचे स्वतंत्र मेळावे सुरू झाले आहेत. भाजपचे नेते मंत्री संजय सावकारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन या तिन्ही प्रमुख नेत्यांची जागा वाटपाच्या संदर्भात बैठक कधी हाेते आणि त्यात चर्चा कितपत पुढे सरकते? यानंतरच पुढील दिशा स्पष्ट हाेणार आहे.