रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे मुशाळतांडा येथे दिवाळीचा आनंदोत्सव; आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि मुलांना खेळणी व फटाके सप्रेम भेट..
भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने दरवर्षीप्रमाणे आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुसाळ तांडा येथे आदिवासी बांधवासोबत दिवाळीचा उत्साही आणि आनंदी क्षण साजरा केला. क्लबने गावातील 110 कुटूंबाना दिवाळी फराळ आणि लहान मुलांना खेळणी व फटाके वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना नवीन खेळणी व फटाके मिळाल्याचा आणि कुटुंबांना पारंपारिक दिवाळीचा फराळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
क्लबचे अध्यक्ष रो. देवेंद्र वाणी आणि सचिव रो. हरमीत सिंग, प्रकल्पाचे प्रमुख रो. सचिन अग्रवाल आणि सह-प्रमुख रो. विकास भराडे यांच्या अचूक नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.या प्रोजेक्ट ला रो. चेतन पाटील, सोनू मांडे, विशाल शहा, आशिष पटेल, अनिकेत पाटील, रणजित खरारे, श्रीकांत जोशी, मिलिंद धर्माधिकारी या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मुसाळ तांडा गावाचे पोलीस पाटील श्री. रवींद्र पवार तसेच स्थानिक समाजसेवक राजू धीरा राठोड आणि गोरेलाल दरबार यांनी देखील प्रकल्पादरम्यान मोलाची मदत केली.
अध्यक्ष रो. देवेंद्र वाणी म्हणाले, “दिवाळी हा आनंद वाटण्याचा आणि प्रकाश पसरवण्याचा सण आहे. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे हेच सर्वात मोठे समाधान आहे. आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि दरवर्षी प्रमाणे या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभारी आहोत.”
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी नियमितपणे समाजविकास, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून ‘सेवा हेच प्रथम कर्तव्य ‘या रोटरीच्या ध्येयानुसार कार्य करत आहे.




