भुसावळ (प्रतिनिधी) : वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ तहसील कार्यालयासमोर वराडसीम तलाठी नितीन पंडितराव केले (46), कठोरा कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव (49) .भुसावळ येथील खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी (59) यांना जळगाव एसीबीने सोमवारी दुपारी अटक केली होती. दरम्यान, अटकेतील लाचखोरांना मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जळगावातील वाळू ठेकेदाराकडून स्वीकारली 86 हजारांची रक्कम
दरम्यान, कारवाईप्रसंगी तलाठी केले यांच्या बॅगेत तब्बल एक लाख 65 हजारांची रोकड तर खाजगी पंटर कोळी याच्याकडे लाचेच्या 73 हजारांव्यतिरीक्त 86 हजारांची रोकड आढळली होती. एसीबीने न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले की, खाजगी पंटर शिवदास कोळी याने ही 86 हजारांची रक्कम जळगावातील वाळू वाहतूकदाराकडून वसुल केल्याची कबुली दिली आहे तर केले मात्र सोबत असलेल्या रकमेबाबत काही एक बोलत नसल्याने चौकशी करणे गरजेचे आहे. अटकेतील तीन आरोपींचे एकमेकांशी झालेले संभाषण तसेच त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती, बँक खात्यांचे व्यवहार तपासायचे आहेत तसेच त्यांनी हप्ते कुणाच्या सांगण्यावरून कुणासाठी वसुल केले आहेत ? यासाठी पोलिस कोठडी हवी असल्याचे तपासाधिकारी स्मिता नवघरे व सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी न्यायालयात सांगितल
भुसावळ तालुक्यातील तक्रारदाराची वाळू वाहतूक चालू देण्यासाठी वाळू वाहतुकीच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी 73 हजारांची लाच खाजगी पंटर कोळी याने मागत कोतवाल व तलाठी यांच्याशी बोलणे करून लाच मागणी केली होती. तहसीलदार, मंडळाधिकारी व तलाठी यांच्यासाठी दर महिन्याला 73 हजारांचा हप्ता द्यावा लागेल, असे संभाषणही खाजगी पंटराने तक्रारदारासोबत केले होते. या नंतर तक्रारदाराने या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीअंती भुसावळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला व पंटरानंतर तलाठी व कोतवालाला बेड्या ठोकण्यात आल्या.


