नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मतदार यादीवरील हरकतींसाठी १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी दिलेली मुदत वाढवली आहे. आता नागरिकांना आपली हरकत किंवा सूचना नोंदवण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वेळ मिळणार आहे.

ही प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. याआधी हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी आयोगाने मुदतवाढ जाहीर केली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, सर्व हरकतींचे निपटारे झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.