लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढीचा विचार – अजित पवार

पुणे प्रतिनिधी – कोणतीही सरकारी योजना परिपूर्ण नसते. त्यामध्ये काही ना काही त्रुटी असतात. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार बोलत होते. त्यांनी सांगितले की, “सरकार कोणतेही असो, योजना लोकांपर्यंत पोहोचवताना काही अडचणी येतात. ‘आनंदाचा शिधा’ असो किंवा ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना, त्रुटी दिसून आल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.”

यावेळी अजितदादांनी स्पष्ट केले की, कोणीही कायदा हातात घेऊन काम केल्यास ते सहन केले जाणार नाही, तसेच पोलिसांच्या कामात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही

कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी धनकवडी आणि सिंहगड रोड परिसरातील कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी आपुलकीने गप्पा मारत पाणीपुरी आणि भेळ खाऊन वातावरण हलकेफुलके केले.

दक्षिण पुण्यातील त्रिमूर्ती चौकावरील तोरणा अमृततुल्य येथे भेट दिल्यानंतर अजितदादांनी नागरिकांशीही संवाद साधला.