देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी, समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे – प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे

भालोद (प्रतिनिधी ) कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे कला मंडळाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांना एकत्रितपणे व्यसनमुक्तीची अर्थातच तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण देश व समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे या उद्देशाने शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर व्यसनमुक्तीची व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यासाठी परिपत्रकाद्वारे कळविले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमात कला मंडळाचे प्रमुख डॉ. दिनेश पाटील यांनी व्यसनमुक्तीची शपथ वाचून दाखवली आणि सर्वांनी या वेळेस ‘आपला गाव, आपला परिसर ,आपली शाळा व समाज निकोप व व्यसनमुक्त व्हावा यासाठी सदैव प्रयत्न करण्याची मनःपूर्वक शपथ घेतली

यावेळेस अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे म्हणाले “समाजाचे तसेच देशाचे उज्वल भविष्य घडवायचे असेल, उदयन्मुख समाज निकोप ठेवायचा असेल तर या क्षणापासून आपण सर्वांनी व्यसनांचे दुष्परिणाम समजून घेतले पाहिजे. आणि व्यसनमुक्तीचा निर्धार केला पाहिजे. कारण व्यसनमुक्त व निकोप समाज हेच देशाचे खरे भविष्य असते. सदर कार्यक्रम प्रसंगी मा प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.