भुसावळ शहर काँग्रेसतर्फे ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत आंदोलन!

मतदार यादीतील पारदर्शकता व निष्पक्ष निवडणुकांची मागणी; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी
भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करण्यात आले. मतदार यादीतील पारदर्शकता, मतदान प्रक्रियेची निष्पक्षता आणि लोकशाहीचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश असून, भारतीय संविधानाने प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाही व्यवस्था बळकट ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असणे, मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या वतीने नमूद करण्यात आले.

मतदार यादीतील संभाव्य त्रुटी, पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, दुबार नोंदी तसेच मतदारांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे या बाबींमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मतदार यादीची सखोल पडताळणी करून पात्र मतदारांना न्याय मिळावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.

मतदारांचा अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणी

आंदोलनाद्वारे संबंधित मतदारसंघातील मतदार यादीची नियमानुसार सखोल पडताळणी करावी, चुकीने वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, दुबार नोंदी व चुकीच्या माहितीची चौकशी करावी, तसेच मतदार नोंदणी आणि नाव दुरुस्तीचे अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून प्रत्येक पात्र मतदाराला कोणत्याही अडथळ्याविना मतदान करता यावे, निवडणूक प्रक्रियेबाबत प्राप्त तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी आणि गैरप्रकार पुराव्यांसह निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीत पडताळणी करावी, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

या आंदोलनात भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अहमद इब्राहिम कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रवीण सुरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान, डॉ. मानवतकर, जिल्हाध्यक्ष (एससी विभाग) ॲड. कैलास शेळके, रहीम कुरेशी, सुधाकर बडगुजर, इस्माईल पहेलवान, विलास खरात, संजय खडसे, जकपाल सिंह गिल, सागर वानखडे, इमरान खान, एनएसयूआयचे शहराध्यक्ष ऋषी खरारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदर्शन इंगळे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष यास्मीन बानो, राणी खरात, नगरसेविका आलमा बानो, सुलताना अहमद कुरेशी, नाजमीन कुरेशी आणि लीना तलरलारे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत काँग्रेसच्या वतीने हा लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.