भुसावळातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीत कोंडला वाहनधारकांचा श्वास; रस्ता खुला करण्याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील स्टेशनरोड, लोखंडी बोगदा, व्हीएम मंदिर वॉर्ड रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने मरिमाता मंदिराजवळील अरुंद पुलावर सध्या वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे. पुलावर विक्रेतेही ठाण मांडून बसले आहेत. पालिकेने दुचाकीस्वारा साठी स्टेशनरोड, विठ्ठल मंदिर वॉर्ड रस्ता खुला करण्याची मागणी होत आहे.
पालिकेने शहरातील स्टेशनरोड नंतर बाजारपेठ पोलिस ठाणे चौक काँक्रीटीकरणासाठी बंद केला. यानंतर आता बाजारपेठ पोलिस ठाणे चौक ते विठ्ठल मंदिर वॉर्डातील रस्ताही पूर्व सूचना न देता बंद करण्यात आला आहे. बाजाराला जोडणारा हा पर्यायी मार्गही बंद झाल्याने नागरिकांना आता पांडूरंग टॉकीज मार्गे किंवा कन्या शाळेजवळील बाजारात जावे लागत आहे. पांडूरंग टॉकीज, बाजारवॉर्ड, मॉर्डनरोड, आदींसह उत्तर भागातील मामाजी टॉकीज, गवळीवाडा, गमाडीया प्रेस, ओंकारेश्वर महादेव मंदिर या भागात वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली. या मार्गावरील अतिक्रमणही डोकेदूखी ठरत आहे. यामुळे स्टेशनरोड किमान दुचाकींसाठी तरी खुला होणे आवश्यक आहे.

दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम
रस्ता बंदच्या समस्येमुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. हंबर्डीकर चौक ते दगडी बोगदा, बाजारपेठ पोलिस ठाणे ते बलबलकाशी नाला परिसरातील दुकाने व छ. शिवाजी महाराज संकूल, बाजारपेठ पोलिस ठाणे ते व्हीएम मंदिर वॉर्ड, स्टेशनरोडवरील हनुमान मंदिर ते अमर स्टोअर्स भाग या रस्त्याचे काम सुरु असलेल्या प्रमुख मार्ग व त्यामुळे वाहतूक बंद झालेल्या मार्गावरील दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.