भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर आणि नांदुरा या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून आता रावेर व बोदवड स्थानकांवर पुणे-दानापूर एक्स्प्रेसला थांबा मंजूर झाला आहे

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रावेर सह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मजूर केला आहे. त्यात पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तर अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी १२१५० दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, १२६५६/१२६५५ नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, २२१७७/२२१७८ महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, ११०५७/११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, १२११३/१२११४ गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, १२७१९/१२७२० जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, १२१२९/१२१३० आझाद हिंद आणि २०९२५/२०९२६ सूरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे केली होती.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यां मान्य करत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे.



