नवी मुंबई:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी या विषयी घेतलेल्या आढावा बैठकीत नवी मुंबईचे महापौर श्री जयवंत सुतार यांनी महानगरपालिकेच्या कोव्हिड – 19 विरोधातील कामाला अधिक गतीमानता व बळकटी येण्यासाठी विविध सूचना केल्या. त्यांची अंमलबजावणी करणेविषयी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिका-यांना त्वरीत सूचना दिल्या.
यामध्ये आमदार गणेश नाईक व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कोव्हिड – 19 मधील उपाययोजनांकरीता आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करीता आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी 50 लक्ष रक्कम देणेबाबत पत्र दिले असून या कामांना त्वरीत परवानगी देण्याची मागणी महापौरांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी ठाणे यांनी याविषयी त्वरीत कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवेतील कर्मचारी जीवापाड मेहनत करून वैद्यकिय सेवा पुरवित असून त्यांना विमा कवच लागू करणेबाबत महानगरपालिका आयुक्तांना मागणी पत्र दिले असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याविषयी तातडीने अंमलबजावणी करणेकरीता पालकमंत्री महोदयांनी महानगरपालिका आयुक्तांना सूचित केले.
अशाच प्रकारे हातावर पोट असणा-या कामगार वर्गाचे लॉकडाऊनच्या काळात अतिशय हाल होत असल्याचे निदर्शनास आणून देत महापौरांनी सध्या रेशनिंग दुकानांवर रेशन कार्ड पाहून अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याचे सांगत 3 महिने कार्ड न वापरल्याने अनेक रेशनकार्ड धारकांना रेशनवर अन्नधान्य उपलब्ध होण्यात अडचण होत असल्याचे पालमंत्री महोद्यांच्या लक्षात आणून दिले व असे रेशनकार्ड धारक अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत अशी विनंती केली. त्यासोबतच अनेक जणांकडे रेशनकार्ड नाहीत त्यामुळे त्यांचे रोजच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यामुळे अशा लोकांना लॉकडाऊनच्या काळात शिजविलेले अन्न दिले जावे अशीही मागणी महापौरांनी केली. या दोन्ही अडचणी दूर करण्याचे निर्देश महापौरांनी कोकण विभागीय आयुक्तांनी दिले व कम्युनिटी किचनची संख्या वाढवावी तसेच शहरी भागाप्रमाणे झोपडपट्टी भागातही कम्युनिटी किचन सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत पॅरामेडिकल स्टाफची नवी मुंबई महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर अडचण भासत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत महापौर जयवंत सुतार यांनी महानगरपालिकेसाठी पॅरामेडिकल स्टाफ तातडीने भरती करणेबाबत शासन मंजूरी मिळावी अशी विनंती केली. त्याबाबतही सकारात्मकता दर्शवत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना सूचना दिल्या.
सद्यस्थितीत धूरीकरण करणारे कर्मचारीच निर्जंतुकीकरण फवारणीचे काम करीत असल्याने धूरीकरणाच्या कामावर परिणाम होत आहे हे लक्षात आणून देत याठिकाणीही फवारणीसाठी स्वतंत्र कामगार असण्याची गरज महापौरांनी लक्षात आणून दिली व पालकमंत्री महोदयांनी त्याबाबत कार्यवाही करण्याचे आयुक्तांना सूचित केले. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टरांनाही सुरक्षेची उपापयोजना म्हणून पी.पी.ई. किट देण्याच्या सूचनेविषयी पालकमंत्र्यांनी आदेशीत केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून याची विशेष नोंद राज्य व केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्याबाबतची माहिती आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी याप्रसंगी दिली. पालकमंत्री महोदयांनीही नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या कामांचे विशेष कौतुक केले. पालकमंत्री महोदयांनी कोरोना विषयक विशेष आढावा बैठक घेऊन यावरील उपाययोजनांच्या कामांना गती दिल्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले.



