वाल्मीक नगरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक आणि मारहाण; खोटा पुरावा रचल्याचा आरोप, पोलीसांच्या उपस्थितीतही गोंधळ –


भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील वाल्मीक नगर येथे दोन गटांत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित असतानाही मोठ्या प्रमाणावर दगडफेक, शिवीगाळ, मारहाण झाली. यावेळी खोटे पुरावे रचून फायरींग दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी तब्बल 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी 10 ते 12 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. या प्रकरणात निखिल धामणे, गोपी धामणे, जय उर्फ कालू जाधव आणि आकाश पंडित या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांचा ताफा घटनास्थळी; तरीही जमाव आक्रमक
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:45 वाजता पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पो.ना. अमर सुरेश आवळे हे पो.हे.का. जितेंद्र पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी व योगेश माळीसह वाल्मीक नगर येथे दाखल झाले. त्याचवेळी उपनिरीक्षक अमितकुमार बागुलही घटनास्थळी उपस्थित होते. दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत होते आणि “आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशा धमक्या देत शिवीगाळ करत होते.

फायरींगचा खोटा देखावा; रिकामी पुंगळी आढळली
घटनास्थळी एक 7.65 मिमी कॅलिबरची रिकामी पितळी पुंगळी (कारतूसाचा खोल) सापडली. निखिल धामणे याने पोलिसांसमोर दावा केला की, आकाश रायसिंग पंडीत याने फायरींग केले आहे. मात्र साक्षीदारांच्या जबाबांनुसार आणि प्रत्यक्ष निरीक्षणात कोणतेही फायरींग झाल्याचे आढळून आले नाही. पोलिसांच्या मते, निखिल धामणे याने खोटे कथन करून खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

गंभीर आरोप आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी निखिल धामणे, प्रेम उर्फ गोपी धामणे, आनंद खारे, अंकीत छलवरीया, भावेश बारसे, दादु नवगीरे, जय उर्फ कालू जाधव, बाबा चेंगट, आकाश पंडीत, राज पंडीत, धरनसिंग उर्फ गोलू पंडीत, तुषार तुंडलायक, अभिषेक साठे, सोनु पथरोड व इतर 10-12 अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये IPC कलम 194(2), 125(क), 189(2)(3)(5), 190, 191(2), 229, 352, 351(2)(3), 115(2) तसेच मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37(1)(3), 135 यांचा समावेश आहे.

पोलीस तपास सुरू; सार्वजनिक शांततेला धोका
पोलीस निरीक्षक अमित बागुल यांनी घटनास्थळी जमावाला समजावून सांगितले होते, मात्र आदेश झुगारून संबंधित व्यक्ती घटनास्थळी थांबूनच दगडफेक करत होते. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सांगळे करीत आहेत. खोट्या पुराव्याच्या आरोपाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.