भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 17 रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. संपूर्ण शहरात शिवजन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
तिथीनुसार साजरी होणार्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे समितीचे अध्यक्ष निर्मल (पिंटू) कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात रविवारी पावनखिंड दौंडमध्ये 538 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नाहाटा महाविद्यालयापासुन भगवा ध्वज दाखवून दौड सुरू झाली. समारोपप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार पाटील, रनर डॉ. निलिमा नेहेते उपस्थित होते. या स्पर्धेतील पुरुष व महिलांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, मुलींना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर सायंकाळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात वेशभुषा स्पर्धेत बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, जिजाऊ, तानाजी मालुसरे, संभाजी महाराज यांच्या वेशभुषा साकारल्या. तसेच शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रकला व निंबध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. तर सायंकाळी 7.30 वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिलांची भव्य मशाल रॅली शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून शिवस्मारकापर्यंत काढण्यात आली. दरम्यान, महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आरती केली. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व माँ साहेब जिजाऊ, भवानी माता यांच्या जयघोषाने परिसर दणाणला गेला. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रजनी सावकारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ केलेली सजावट पाहुन उत्सव समितीचे अध्यक्ष निर्मल कोठारी व पदाधिकार्यांचे कौतुक केले. तर रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करून मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी, मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शहरातील गांधी नगरमधील छत्रपती शंभूराजे चौकातून माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या मार्गदर्शनात बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावर युवक, युवतींनी हातात भगवे ध्वज व मशाल घेऊन रोलर स्केटिंग केले. तसेच विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील विविध भागातून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी एकूण ९ मिरवणुकींद्वारे महाराजांना वंदन करण्यात आले.
कार्यक्रमात शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते ‘शिवभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.


शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हजारो शिवभक्तांनी एकत्र येऊन शिवरायांना अभिवादन केले. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे मोठी गर्दी पाहायला मिळाली. भगव्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर सजला होता. जय शिवरायच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. कार्यक्रमांसाठी उत्सव समिती अध्यक्ष निर्मल कोठारी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजू आवटे, मुकेश गुंजाळ, नितीन धांडे, संतोष (दाढी) चौधरी, किरण कोलते, हर्षल पाटील, उमाकांत शर्मा (नमा), दर्शन चिंचोली, शुभम लुंकड, भूषण महाजन यांच्यासह शेकडो शिवभक्तांनी परिश्रम घेतले.


