भुसावळ – भुसावळ शहरात साधारण सात वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये काही नागरिकांनी धावण्याचा एकत्रित सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर हे धावपटू नियमितपणे धावण्याचा सराव करून देशातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवू लागले. त्यांपैकी काही धावपटूंनी प्रा. प्रवीण फालक यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याची रितसर मान्यता मा. धर्मादाय आयुक्त, जळगाव यांच्याकडून घेण्यात आली. 18 डिसेंबर रोजी ही मान्यता मिळाली त्यामुळे हा दिवस धावपटू, सायकलपटूंतर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावेळी माधुरी चौधरी, डॉ नीलिमा नेहेते, स्वाती फालक, पुनम भंगाळे, अर्चना चौधरी, किर्ती मोताळकर, संगीता चौधरी, गरिमा न्याती, सरला पाटील, एकता भगत, डॉ वर्षा वाडिले, विनिता शुक्ला, माया पवार या महिला धावपटूंसोबतच संजय भदाणे, मुकेश चौधरी, उमेश घुले, छोटू गवळी, प्रवीण वारके, ताराचंद खरारे,रमेशसिंग पाटील, सुयश न्याती, मंगेश चंदन, संतोष घाडगे, राजेंद्र घाटे,सारंग चौधरी व प्रवीण पाटील या पुरूष धावपटूंनी 18 किमी एकत्रित धावून वर्धापन दिन साजरा केला. या रनचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व महिला व पुरुष धावपटूंनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या अठराव्या किलोमीटर पर्यंत सारख्या वेगात व सोबत 18 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.
सुरुवातीस पहाटे कडाक्याच्या थंडीत 4.30 वाजता वाॅर्मअपनंतर शहरातील रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे वसाहतीचा परिसर व त्यानंतर आरपीडी रस्त्यावर या धावपटूंना भल्या पहाटे व थंडीत धावताना बघून परिसरातील प्रवासी मोठ्या कुतूहलाने आश्चर्य व्यक्त करीत होते. सोबतच धावताना भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत धावपटू उत्साहात धावत होते. वर्धापन दिनानिमित्त 18 किलोमीटर धावणाऱ्या या धावपटूंसोबतच काही नवोदित धावपटूंनी सातवा वर्धापन दिन असल्यामुळे सात किलोमीटर धावण्याचा मानस निश्चित केला होता व त्या अनुषंगाने हे नवोदित धावपटू शेवटच्या सात किमीसाठी या धावपटूंच्या सोबत एकत्र आले व सर्वांनी एकत्रित रित्या आपली धाव मैदानावर पूर्ण केली.
धावणे पूर्ण झाल्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली.
त्यानंतर मैदानावर वर्धापन दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम प्रविण पाटील यांनी सूत्रसंचालन करताना गेल्या सात वर्षात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा प्रगतीचा आलेख थोडक्यात सर्व उपस्थितांना नमूद केला. त्याचबरोबर अगदी काही मोजक्या धावपटूंपासून सुरू झालेला हा प्रवास दीडशे धावपटूंपर्यंत कसा पोहोचला तसेच देशातील व परदेशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये असोसिएशनच्या धावपटूंनी कसे शहराचे व असोसिएशनचे नाव उंचावले ते देखील नमूद केले. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात असोसिएशनतर्फे संजय तिवारी व पुष्पा तिवारी या धावपटू दांपत्याने असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर 2024 यावर्षी आपल्या धावण्यात अतिशय सातत्य ठेवल्यामुळे व धावण्याची प्रगती उंचावून इतर धावपटूंना प्रेरित केल्यामुळे महिला गटातून माधुरी चौधरी या धावपटूचा सत्कार डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी केला. तसेच पुरुष गटातून मंगेश चंदन यांचा सत्कार प्रा. प्रविण फालक व डाॅ. तुषार पाटील यांनी केला. याप्रसंगी सुयश न्याती, रेवती मांडे आदी सदस्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर असोसिएशनने ठरविल्यानुसार वर्धापन दिनाचा कार्यक्रम केक किंवा तत्सम पदार्थ न कापता पपई कापून आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छोटू गवळी, पुष्पलता चौधरी, मनीषा सिंग, रिना परदेशी यांचे सहकार्य लाभले.




