रावेर – तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर भुसावळ येथून मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परतत असताना एक भरधाव कार झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबाबत सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.


भुसावळ येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमास शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच मित्र गेले होते गेले होते. तेथून कार क्रमांक (एम एच २० सीएस ८००२) ने परतत असताना सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर पहाटे ३ वाजता सुमारास कार एका झाडावर जोरदार आदळली. यामध्ये शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा,रावेर) असे मयत तरुणांची नावे आहेत या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून .या तिघांसह गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा), आणि विकी उदय जाधव (वय २५, रा.स्टेशन रोड, रावेर) असे पाच मित्र होते .

घटनेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून शुभम सोनार, जयेश भोई आणि मुकेश रायपुरकर हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी गणेश भोई जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात तर विकी जाधव याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली असून सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

तिघा मित्रांची कौटुंबिक पार्श्वभूमी
मयत सर्व तरुण असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत शुभम दशरथ सोनार याला आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून तीन बहिणींच्या पाठीवरील तो एकुलता एक होता. त्याचे वडील सोनारी दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. जयेश केशव भोई याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात.
मुकेश किशोर रायपूरकर याच्या मागे आई आणि बहीण असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. तर गंभीर जखमींमध्ये गणेश भोई यांच्या घरी आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तो फोटोग्राफीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो.दुसरा गंभीर जखमी विकी जाधव हा २५ वर्षाचा विद्यार्थी असून त्याच्या घरी आई वडील, बहीण आहेत. वडील गॅरेजवर काम करून घर चालवितात.


