जळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा डंका : 59 हजार 232 मतांनी मिळवला विजय ;

जळगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली. दोन गुलाबरावांच्या लढाईत कोण बाजी मारणार ? याकडे लक्ष लागून असतानाच पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आपला करीश्मा दाखवत विजयाची पताका फडकवली. तब्बल 59 हजार 232 मतांनी ते विजयी झाले.

पहिल्या फेरीपासून मताधिक्यात आघाडी
निवडणुकीत प्रमुख दोन मातब्बर नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह इतर पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केला. शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेच्या झालेल्या मतमोजणीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली तर त्यांनी विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करत मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.

59 हजार मतांनी विजयी
गुलाबराव पाटील यांना एक लाख 43 हजार 408 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 84 हजार 176 मते मिळाली. तब्बल 59 हजार 232 मतांनी मंत्री गुलाबराव विजयी झाले. विजयाची घोषणा होताच कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केली तर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत नृत्य केल्यानंतर त्यांच्या आनंदात गुलाबरावही सहभागी झाले.