यावल – यावल शहरातील विस्तारित भागातील आयशानगर परिसरात राहणारे कुटुंब हे बाहेरगावी गेल्याचे पाहुन अज्ञात चोरट्यांनी घरातील कोंडे वाकवून सुमारे १ ते दीड लाख रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावल पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील विस्तारित भागातील वसाहतीत राहणारे सैय्यद साबीर सेय्यद मरू (वय ५० वर्ष) हे कुटुंबासमवेत राहतात. ते दि. २० रोजी सुरत येथे नातेवाईकाकडे गेले होते. घरी कुणीच नसल्याचे पाहुन चोरट्यांनी संधी साधुन घराचा दरवाज्याच्या कोंडया वाकवुन घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील मुलीच्या लग्नासाठी आणुन ठेवलेले दागीने व रोख रक्कम असा सुमारे १ ते दिड लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
घरी कुणीही नसतांना दरवाजा उघडा दिसल्याने शेजारच्या मंडळीने घरात पाहिले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


