महिलेच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा डिलिव्हरी बॉय जेरबंद ! – युनिट एकची कारवाई !

नाशिक : पंचवटी परिसरात आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली होती. परिसरात राहणाऱ्या एका इमारतीमधील महिलेच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक अद्यापही कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

          शुक्रवार दि. २३ रोजी लामखेडे मळा परिसरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी हि आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन पुन्हा घरी येत होती. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास उमाशक्ती अपार्टमेंट समोर एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकाने पीडित मुलीस पत्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी पत्ता माहित नसल्याचे पीडित मुलीने सांगतच या अज्ञात युवकाने पीडित मुलीस जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. याचवेळी बाजूच्या इमारतीमधील एका महिलेने हा सर्व प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यामुळे संशयित युवकाने मोपेड दुचाकीसह पळ काढल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी आपला संताप व्यक्त केला होता. याबाबत पीडितेच्या वडिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

         या बाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच, आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक डिलिव्हरी बॉय संशयित म्हणून आढळून आला. या डिलिव्हरी बॉयचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत संशयित फारूख मोहंमद पठाण, ३९, रा. श्रमिक हौसिंग सोसायटी, राजीवनगर नाशिक याला अटक केली. तसेच, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबाबत कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला अटक करीत पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

          ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, पोहवा प्रदीप म्हसदे, विशाल काठे, पोअं आप्पा पानवळ, नितीन जगताप, पोअं विलास चारोस्कर, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी केली आहे.