भुसावळ नाहाटा महाविद्यालय स्थानिक एन-मुक्टो प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.डी एन पाटील तर सचिवपदी प्रा.हर्षल पाटील यांची बिनविरोध निवड

भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालयात एन् मुक्टो प्राध्यापक संघटनेची स्थानिक शाखेची द्वैवार्षिक निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी अधिसभा सदस्य प्रा ई जी नेहेते यांनी अनमोल मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संघटनेची जडणघडण व भविष्यातील आंदोलनांची माहिती दिली. सद्यस्थितीत एकूण उच्चशिक्षण प्रणालीकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी प्रत्येक महाविदयालयात प्राध्यापकांच्या बहुसंख्य जागा रिक्त आहेत. यासाठी शासनाने अन्यायकारक अशी घडयाळी तत्वावर सेवा सुरु केलेली आहे. त्यातच शासनाने नवीन शैक्षणिक धोरण सारासार विचार न करता लागू केलेले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. परिणामी देशाची भावी पिढी सक्षम न होता दुर्बल होत आहे व देशाचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. यासाठी प्रा. नेहेते यांनी ऐक्याचा नारा दिला व प्रसंगी संघटना शासनाशी न्याय्य लढा देईल अशी ग्वाही दिली. तदनंतर डॉ. अनिल हिवाळे व प्रा. सोळुंके यांनी सुद्धा संघटनेची भूमिका मांडून संघटनेचा लढवय्या बाणा दर्शवून दिला. यानंतर एन् मुक्टो संघटनेच्या परंपरेनुसार सदर निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून प्रा. व्ही. डी. जैन यांनी व सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून डॉ. जे. एफ्. पाटील यांनी काम पाहिले. सदर निवडणूकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहीत एकूण दहा पदांसाठी निवड करण्यात आली. सदर कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली:

अध्यक्ष- प्रा. डी. एन्. पाटील , उपाध्यक्ष- डॉ. आर. एस्. नाडेकर , सचिव- प्रा. हर्षल व्ही पाटीलसहसचिव: प्रा. व्ही. ए. सोळुंके , खजिनदार- डॉ. रश्मी शर्मा ,अंतर्गत हिशेब तपासणीस- डॉ. ममताबेन पाटील ,जिल्हा प्रतिनिधी- डॉ. के. ए . वारके , केंद्रीय प्रतिनिधी- प्रा. ई. जी. नेहेते महिला प्रतिनिधी- डॉ. स्वाती पी. फालक ,निवृत्त शिक्षक- डॉ. ए. डी. गोस्वामी
सदर निवडणूक पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे, यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविदयालयातील कार्यालयाने सुद्धा अनमोल सहकार्य केले. नवनिर्वाचित कार्यकारणीचे मावळते प्रभारी अध्यक्ष डॉ एस पी झनके, मावळते सचिव डॉ पी ए अहिरे यांच्यासहित अधिसभा सदस्य प्रा ई जी नेहेते, निवडणूक अधिकारी प्रा व्ही डी जैन आणि डॉ जे एफ् पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .