भुसावळ – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी युजीसीमार्फत घेण्यात आलेली राज्य पात्रता चाचणी तथा सेट परीक्षा शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण केली आहे.

यूजीसीमार्फत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राज्य पात्रता चाचणी तथा सेट परीक्षा एप्रिल 2024 मध्ये पार पडली. या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात शिक्षणशास्त्र विषयात डॉ. जगदीश पाटील पात्र ठरले आहेत. त्यांनी मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून 2022 मध्ये मराठी विषयात नेट व 2023 मध्ये शिक्षणशास्त्र विषयात नेट उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर आता 2024 मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने युजीसीची परीक्षा सलग तिसऱ्यांदा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



