भुसावळ रेल्वे स्थानकाजवळून तरुणाचा धूम स्टाईल मोबाईल लांबवला –

भुसावळ – सायकलीवरून कामावर जाताना फोन आल्यानंतर तरुण मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून धूम स्टाईल आलेल्या दोघा भामट्यांनी तरुणाचा नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना शहरातील रेल्वे स्थानकाजवळ बुधवार, 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनेश हरिदास घोडाम सरोज (38, रा.नागसेन कॉलनी, कंडारी) या तरुणाच्या तक्रारीनुसार, बुधवार, 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सायकलीवरून कामावर जात असताना त्यांना फोन आला व ते फोनवर बोलत असताना पाठीमागून धूम स्टाईल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी काही सेकंदात मोबाईल लांबवत धूम ठोकली. तरुणाने आरडाओरड केली मात्र भामटे तो पर्यंत पसार झाले. गुरुवारी तरुणाच्या तक्रारीनुसार भुसावळ शहर पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहे.