भुसावळ – येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात आज मंगळवार रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन राणे यांचे “चला व्यसनाला गुड बाय म्हणू या!” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती रागिणी पुराणिक ह्या होत्या.
आपल्या प्रमुख भाषणात प्रा. डॉ दयाघन राणे यांनी व्यसनांचे निरनिराळे प्रकार सांगून व्यसन लागण्याची कारणे सांगितली. व्यसन लागण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अमली पदार्थाचे सेवन करण्याची कोणतीही सुरक्षित पातळी नसते हे सांगून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ शरीरासाठी कशा पद्धतीने घातक आहेत हे त्यांनी विविध उदाहरणे देवून स्पष्ट केले. तसेच व्यसन सोडण्यासाठी असणाऱ्या काही पद्धती सांगून कुणाला गुटखा दारू किंवा अन्य अमली पदार्थाचे व्यसन असेल तर ते कसे सोडवायचे हे सुध्दा त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती रागिणी पुराणिक यांनी व्यसन लागू नये म्हणून सतत जागरूक राहावे आणि जर कुणाला कोठलेही व्यसन असेल तर मनाचा संयम पाळत व्यसनापासून दुर राहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या समाप्ती नंतर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी प्रसारित केलेल्या व्यसनमुक्ती च्या शपथ चे वाचन प्रा डॉ दयाघन राणे यांनी केले आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनाम जप घेण्यात आला. प्रसंगी प्रा डॉ दयाघन राणे यांचे स्वागत श्रीमती रागिणी पुराणिक यांनी केले. तर सूत्र संचालन श्रीमती अलकाताई ढाके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मदन बोरकर यांनी आणि आभार संजय चापोरकर यांनी मानले.



