भुसावळला चांगल्या उपक्रमाचे आदान प्रदानासाठी शिक्षणोत्सवाचे आयोजन तुषार प्रधान

भुसावळ (प्रतिनिधी )-
शिक्षण प्रक्रियेतील बदल समाजातील घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी; तसेच नाविण्यपूर्व विचारांचे आदान-प्रदान होऊन त्यातून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केले आहे. तालुकास्तरावरील एक दिवसीय शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन 14 मार्च ला करण्यात येणार असून, याची अंमलबजावणी काटेकोर करायची या माध्यमातून शाळा स्तरावर ती सुरू असलेल्या चांगल्या उपक्रमांचे आदान-प्रदान होणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकरी तुषार प्रधान यानी केले
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची शिक्षणोत्सव कार्यक्रमासाठी बैठक वरणगाव गटसाधन केंद्रात आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, बि डी बोदडे, संजय श्रीखंडे विषय तज्ञ शिक्षक संजय गायकवाड आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना तुषार प्रधान म्हणाले की शाळांमध्ये शिक्षक मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. मूल शिकावे म्हणून शिक्षकांनी केलेल्या विविध प्रयत्नातून शाळांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्राचा वापर केला जात आहे. लोकसहभागातून शाळा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्या गेल्या आहेत. या नव्या विचारधारेने मार्गक्रमण करीत असताना शाळा आधुनिकतेची कास धरून पुढे जात आहेत. शिक्षकांच्या मनोवृत्तीत बदल होत असून ते परिवर्तनाचे दूत होत आहेत. या परिवर्तनाच्या सर्व प्रक्रियेत शिक्षक, मुख्याध्यापक, क्षेत्रिय अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा व शाळा व्यवस्थापन समिती देखील सक्रिय सहभागी होत आहेत. शिक्षण प्रक्रियेतील बदल विद्यार्थी, पालक, नागरिक अशा घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरावर २५ ते ३० स्टॉल ‘गुगल लिंक’द्वारे विषयसूची व मूल्यमापनाच्या निकषांनुसार निवडावे लागणार आहे. जिल्हास्तरीय शिक्षणोत्सवासाठी प्रत्येक तालुक्यातून निवड समितीच्या माध्यमातून ५ स्टॉलची निवड होणार आहे त्यानंतर दोन दिवसीय जिल्हास्तरीय शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन होणार आहे जिल्हास्तरावर २ स्टॉलची निवड राज्यस्तरावर होणार आहे,
दैनंदिन अध्ययन अध्यापनातील साहित्याचा वापर करा – शैलेश पाटील
यावेळी शिक्षणोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी शिक्षण उत्सवाचे संकल्पना त्यासाठी करावयाचे स्टॉल साहित्य याची माहिती देताना सांगितले की दैनंदिन अध्ययन अध्यापन करताना विविध साहित्य अथवा उपक्रमांची जोड देत असतो याच उपक्रमाची मांडणी या स्टॉलमध्ये करायची आहे या माध्यमातून आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे
या विषयावर होणार शिक्षणोत्सव
स्वच्छ विद्यालय-शाळा स्वच्छता, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन,
किशोरवयीन आरोग्य शिक्षण, मासिक पाळी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व हात धुण्याची सुविधा, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. वाचन चळवळीशी संबंधित उपक्रम ,मूल्यमापन संदर्भातील तंत्रज्ञान, ॲप व नाविन्यपूर्ण पद्धती, अध्ययन निष्पती, सौरऊर्जा, मध्यान्ह भोजन, किचन गार्डन ज्ञानरचनावाद, कौशल्ये, जीवन कौशल्यावर आधारित उपक्रम, भाषा, गणित, इंग्रजी विकास संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, कला, क्रीडा, कार्यानुभव व सहशालेय याबाबतचे उपक्रम, पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठीचे प्रभावी उपक्रम.बालकांची सुरक्षितता, पूर्वप्राथमिक ते प्राथमिक शिक्षणासाठीचे उपक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *