देवा झिंजाड यांना स्मृतीशेष चमेलीभाऊराव राज्यस्तरीर कादंबरी पुरस्कार प्रदान !

जळगाव – स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने गेल्या आठवड्यात स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार पुणे येथील लेखक श्री. देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या एक भाकर तीन चुली या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे तर्फे प्रकाशित कांदबरीस घोषित करण्यात आला होता. रोख रक्कम पाजच हजार रूपये, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असे होते. सदरची पुरस्काराची रक्कम लगेचच देवा झिंझाड यांचे बँक खाते प्रतिष्ठानच्या वतीने जमाही करण्यात आली. आपला पुरस्कार आपल्या गावी सन्मानपूर्वक देण्याच्या संकल्पनेतून देवा झिंजाड यांना पूणे येथील बालभारती आणि पाठ्यपुस्तक निर्मितीचे संचालक कृष्णकुमार यांचे हस्ते बालभारतीच्या कार्यालयात सन्मानाने मंगळवारी दि.११ जून २०२४ रोजी संचालक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि सहकारी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या अनोख्या समारंभात लहानपणी बालभारतीचे पुस्तक विकत घेण्यासारखी परिस्थिती नसताना अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण आणि जीवन संघर्ष पेललेल्या या लेखकास बालभारतीच्याच कार्यालयात शिक्षण संचालकांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचा आनंद पाणावलेल्या डोळ्यांतील आनंदाश्रूनां वाट मोकळी करुन देणारा ठरलाय.

     याच प्रतिष्ठानच्या वतीने दुसरे पुरस्कारार्थी कवी गीतेश गजानन शिंदे ठाणे यांना स्मृतीशेष चमेलीभाऊराव राज्यस्तरीय काव्य पुरस्कार *सीसीटीव्हींच्या गर्द छायेत* या शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर येथून प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहास घोषित झालाय. या पुरस्काराचे स्वरुपही रोख रक्कम पाच हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पुरस्काराची रक्कम पुरस्कार्थी यांचे बँक खात्यात जमा करण्यात आलेली असून लवकरच ठाणे येथे मान्यवर लेखकांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रदान करण्यात येणार आहे.प्रतिष्ठेच्या या पुरस्काराने साहित्य वर्तुळा एक वेगळे वलय निर्माण झालेले आहे. २०२४च्या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानच्या वतीने  उषा हिंगोणेकर आणि शशिकांत हिंगोणेकर यांनी आवाहन केल्याने पुरस्कारासाठी नव्या पाच प्रवेशिकाही प्राप्त झालेल्या आहेत.प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे साहित्य क्षेत्रात स्वागत आणि अभिनंदनही करण्यात येत आहे.