भुसावळ – दक्षिण आफ्रिका येथे नुकत्याच पार पडलेल्या ८५.९ अर्थात ८६ कि.मी. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या डॉ तुषार पाटील व विजय फिरके या धावकांनी स्पर्धेत भाग घेतला होता व दोन्ही स्पर्धकांनी ही मॅरेथॉन विहीत वेळेच्या आधीच पूर्ण करुन आपली चमक दाखवून दिली. यामध्ये डॉ तुषार यांनी सलग दुसऱ्यांदा ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. सलग दोन वर्ष कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये पदक प्राप्त करणारे जळगाव जिल्ह्यातील ते एकमेव धावपटू आहेत. त्याशिवाय विजय फिरके यांनी पहिल्याच प्रयत्नात अतिशय सहजपणे विहीत वेळेच्या आधीच हे आव्हानात्मक अंतर पार केले.
सुमारे १७५० मीटर उंचीची चढाई असल्याने या स्पर्धेला जागतिक स्तरावर सर्वात आव्हानात्मक व अल्टीमेट ह्युमन रेस म्हणून ओळख आहे व शिवाय जगातील सर्वात जूनी अशी मॅरेथॉन कॉमरेड्स मॅरेथॉन असून सीएमए बोर्ड, दक्षिण आफ्रिका यांच्या वतीने यावर्षी ९७ वी कॉम्रेड मॅरेथॉन डर्बन येथे आयोजीत करण्यात आली होती. दक्षिण आफ्रीकेतील वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता कॉम्रेड मॅरेथॉन डर्बन सेंट्रल पोस्ट ऑफीस पासुन सुरु झाली व पिटर्समारीबर्ग ला सायंकाळी ५.३० वा. समाप्त झाली. जगभरातील सुमारे २० हजार पेक्षा जास्त धावक या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतातील ३६६ धावकांनी कॉम्रेड स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ३३६ पुरुष तर ३० महिलांचा सहभाग होता. महाराष्ट्रातून २२ महिला सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी १६ महिलांनी ही स्पर्धा १२ तासाच्या कालमर्यादेत पुर्ण केली.
१२ तासांची कालमर्यादा असलेल्या या स्पर्धेत डॉ तुषार पाटील यांनी केवळ १० तास ३५ मिनिटे व ३७ सेकंदात हि कामगिरी पूर्ण केली तर विजय फिरके यांनी ११ तास ३२ मिनिटे व २६ सेकंदात हे निर्धारित अंतर पूर्ण केले.
त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण असून असंख्य नागरिकांनी उभयतांना शुभेच्छा दिल्या.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे जोरदार स्वागत:
डॉ तुषार पाटील व विजय फिरके यांचे पहाटे शहरात आगमन होताच भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंतर्फे रेल्वे स्टेशनवर उभयतांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे प्रमुख प्रा प्रविण फालक, डॉ तुषार पाटील यांच्या पत्नी व स्वतः उत्तम धावपटू असलेल्या डॉ चारुलता पाटील, मुलगा सिद्धेश पाटील, मुकेश चौधरी,संजय भदाणे,अजय आंबेकर,संतोष घाडगे,तरुण बीरिया,सारंग चौधरी,जितेंद्र चौधरी,जयश्री चौधरी,राजेंद्र ठाकूर,महेंद्र पाटील,रमेशसिंग पाटील,प्रमोद शुक्ला,मनोज राणे,संजू पाटील,विकास पाटील,संतोष गवळे,डॉ निर्मल बलके, प्रविण पाटील हे उपस्थित होते. त्याशिवाय शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शंभरहून अधिक महिला व पुरुष धावपटू, सायकलपटू व जलतरपटू उपस्थित होते.



