भुसावळ,( प्रतिनिधी)– नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी 26 जूनला मतदान होणार असून शाळा 15 जूनला सुरू होत असल्याने शिक्षकांच्या गाठीभेटी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना सहज होतील. त्यावेळेला प्रचारात खरी रंगत येण्याची स्थिती दिसून येत आहे. सध्या हाऊस टू हाऊस भेटीगाठीवर उमेदवारांचे कार्यकर्ते भर देत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार नसल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक असली तरी या निवडणुकीत राजकीयपक्षांचा सहभाग ठळकपणे असल्याने या निवडणुकीला एक प्रकारे राजकीय रंग चढला असल्याचे जाणवते. शिक्षक संघटना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सोबत निवडणुकीच्या निमित्ताने जातील याचे दूरगामी परिणाम भविष्यात शिक्षक संघटनांना जाणवल्याशिवाय राहणार नाही असे जुन्या जाणत्या शिक्षक वर्गातून सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील जुन्या प्रस्थापित सत्ता केंद्रांना कंटाळून काही समविचारी संघटनांनी एकत्र येत जिल्ह्यात माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची निर्मिती केली. समितीच्या राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे पगार करणे या मागणीसह इतरही काही प्रमुख मागण्यांना जिल्हा व राज्यस्तरावर न्याय मिळाला. त्यावेळेस ऋणनिर्देश मेळावा घेण्यात आला. परिणामी जिल्ह्यामध्ये आणखी काही संघटनांनी शैक्षणिक व्यासपीठाची निर्मिती केली. या समन्वय समिती व शैक्षणिक व्यासपीठ दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध शिक्षक संघटनांचा सहभाग असल्याने त्यांच्या भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यात निर्विवाद सत्य असल्याचे सांगण्यात आले. त्यातल्या त्यात या वेळेला नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार दिला गेलेला नसल्याने राज्य शिक्षक परिषदेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जाणकार शिक्षक वर्गातून सांगण्यात आले .
या निवडणुकीत 21 उमेदवार रिंगणात असून दोन प्रबळ दावेदार उमेदवार हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. तर या निवडणुकीत जिल्ह्यातून एका उमेदवाराचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार सर्वाधिक असल्याचे त्यात दिसून येते. परिणामी सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोणता प्रमुख उमेदवार मतदान जास्त घेतो यावरही यश अपयश अवलंबून राहणार आहे.
जवळपास पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात यावेळेस राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार नसल्याने अहमदनगर जिल्ह्यासह इतर सर्व जिल्ह्यात शिक्षक परिषदेची भूमिका मात्र निर्णायक ठरणार असून त्यांची भूमिका ही दखलपात्र राहू शकते असे शिक्षक वर्गातून सांगण्यात आले. एकच मिशन– जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शिक्षकांसाठी असलेल्या शिक्षक मतदार संघात राजकीय पक्ष कशा पद्धतीने हाताळतात व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन संदर्भात कोणती आश्वासने देतात? कर्मचारी या प्रश्नाबाबत कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकतात यावरही बऱ्याच अंशी विजयाचा मार्ग अवलंबून असेल. आजच्या घडीला राज्य व विभाग पातळीवरील नेत्यांचा पाठिंबा एका उमेदवाराला तर जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दुसऱ्याच उमेदवाराला असे चित्र जळगाव जिल्ह्यात काही संघटनांमध्ये नेमेची येतो पावसाळा याप्रमाणे होण्याची शक्यता नाकारता येत नसून शिक्षकांची कामे जिल्हा पातळीवर विभाग राज्य पातळीवर कमीत कमी वेळात कशी मार्गी लागत जातील याचा विचार या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार, शिक्षक व संघटना पदाधिकारी यांच्या माध्यमातून होणे अपेक्षित असल्याचे शिक्षक वर्गातून बोलले जात आहे.



