यावल तालुक्यात घर कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू -थोरपाणी आदिवासी पाड्यावरील घटना : दहा वर्षीय बालक बचावला

यावल : यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून सातपुड्याच्या जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील घर कोसळले. या घटनेत एकाच कुटूंबातील चार जण जागीच दगावले तर या कुटुंबातील दहा वर्षाचा बालक हा बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी पथकासह रवाना झाले.

एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू
रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह यावल तालुक्यात पाऊस झाला यात तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा या गावापासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावर प्रचंड वादळ आल्याने वादळामध्ये नानसिंग गुलाब पावरा (28) यांचे घर कोसळले. या घरात नानसिंग पावरा सह त्यांच्या 26 वर्षीय पत्नी, तीन वर्षीय मुलगा व दोन वर्षीय मुलगा हे चार जण दगावले. या घटनेत पावरा कुटूंबाचा 10 वर्षीय मुलगा बचावला.
या घटनेची माहिती वाघझिरा गावात देण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग बारेला यांनी प्रशासनाला माहिती कळवली.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
घटनास्थळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे पथकासह रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत चौघांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.