मुक्ताईनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत जळगावातील सराफा व्यावसायीकाचे सुमारे 20 लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधित सराफा कारमधून हे दागिने मुक्ताईनगरमार्गे बर्हाणपूरकडे नेत असताना त्याच्याकडे दागिण्यांचे कुठलेही कागदपत्रे अथवा पावत्या नव्हत्या पावत्या विनाच दागिण्यांची वाहतूक करीत असल्याने ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने सराफा व्यावसायीकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत परिवर्तन चौकात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी लावण्यात आली. पोलिसांच्या पथकाला टोयोटो कार (एम.एच.19 सी.यु.8132) दिसताच त्यांनी ती अडवल्यानंतर तिची तपासणी केली असता सराफा व्यावसायीक भंवरलाल जेठमल जैन (जळगाव) यांच्या बॅगेत सुमारे 20 लाखांचे 279.730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळले. संबंधित सराफाला दागिण्यांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे दागिण्यांच्या पावत्या न आढळल्याने फिरते पथक प्रमुख अनिल नेरपगार यांना बोलावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक नागशे मोहिते, सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, हवालदार छोटू वैद्य, पोलीस शिपाई प्रशांत चौधरी, पोलीस शिपाई प्रवीण जाधव, शिपाई अभिमन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली .



