गोदान एक्सप्रेसला आग : परिस्थिती नियंत्रणात , सुदैवाने अनर्थ टळला :

भुसावळ – मुंबईकडून गोरखपूर कडे जाणाऱ्या 11055 अप गोदान एक्सप्रेस प्रवासी गाडीच्या शेवटचा जनरेटर असलेला पार्सल डब्याला आज २२ मार्च रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान नाशिक रेल्वे स्थानका नजिक आग लागली ..यामध्ये सुदैवाने अनर्थ टळला . गोदान एक्स्प्रेसच्या शेवटच्या बोगीला अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीने एकच धावपळ उडाली . प्रसंगी घटनास्थळी अग्निशमन दल कर्मचारी , रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यास प्रयत्न केले सुदैवाने पुढील अनर्थ टळला . आग नेमकी कश्यामुळे लागली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही .

दरम्यान आगीचे वृत्त समजताच तात्काळ घटनास्थळी रेल्वे अधिकारी यांनी भेट दिली . त्वरित रेल्वे कर्मचारी व संबंधित अधिकारी यांनी यावेळी आग लागलेली गोदान एक्सप्रेसची बोगी त्वरित काढून बाजूला केली व आग काबूत ठेवण्यात यश मिळवले यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला व त्यांनी सुटकेचा श्वास घेतला . अवघ्या थोड्या वेळात प्रवाश्याना पुढील बोगीत बसवून गाडी रवाना करण्यात आली .