क्लच वायरने बिबट्याचा गळा आवळणारे अटकेत :

नाशिक : भोंदू बाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीसाठी सुपारी घेऊन बिबट्याची शिकार करणा-या शिका-यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. मोटार सायकलच्या क्लच वायरने गळा आवळून बिबट्याची शिकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुख्य शिकारी – आरोपी नामदेव दामू पिंगळे याने त्याचा साथीदार सतोष जाखिरे याच्यामार्फत या शिकारीची ‘सुपारी’ दिली होती. संशयीत आरोपी नामदेव पिंगळे (रा. पिंपळगाव मोर), संतोष जाखिरे (रा. मोगरा), रवींद्र अघान (रा. खैरगाव), बहिरु ऊर्फ भाऊसाहेब बेंडकोळी (रा. वाघ्याची वाडी) आणि बाळू धोंडगे (रा. धोंडगेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत एका डोंगरावरील पाण्याच्या डोहाजवळ रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वन्य पशू पाणी पिण्यासाठी येत असतात. पाण्याच्या शोधात तहान भागवण्यासाठी आलेल्या बिबट्याची चकवा देत सापळा रचून या ठिकाणी क्लच वायरचा गळफास तयार करुन कृर हत्या करण्यात आली आहे. बिबट्याची कातडी सन्यासी दिलीप बाबा नावाच्या इसमाला विक्री करण्यापुर्वीच पोलिसांना हा डाव उधळण्यात यश आले असले तरी बिबट्याचा नाहक जीव गेला.