जळगावच्या नवी पेठेत ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न – घटना सीसीटीव्ही मध्ये कैद :

जळगाव : चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असताना गजबजलेल्या नवी पेठेत सराफा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने तिजोरी न उघडल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. शुक्रवारी पहाटे नवी पेठेतील लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात एका चोरट्याने चोरीचा प्रयत्न केलामात्र सुदैवाने तिजोरी उघडली नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.
हेमंत रुंगठा आणि त्रिलोक रुंगठा यांचे लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाचे दुकान नवी पेठेत आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत हेमंत रुंगठा यांनी दुकान बंद केले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजून 53 वाजता एका चोरट्याने दुकानाची पट्टी तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तिजोरी न उघडल्याने त्याने काही चांदीचे तुकडे घेतले. त्यानंतर त्याने सीसीटीव्हीच्या वायरी कापून पळ काढला. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली.