भुसावळ : भुसावळ पालिकेने नागपूरच्या कंत्राटदारामार्फत शहरातील मालमत्तांची रीव्हीजन केले मात्र करवाढ मागणी पत्रातील अनागोंदीमुळे अनेकांना कमी तर अनेकांना जास्त पद्धत्तीने कर आकारणी करण्यात आली. ही करवाढ रद्द करावी तसेच पालिकेने दलितेतर वस्ती योजनेतून करावयाच्या कामांसाठी 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख दीपक धांडे यांनी भुसावळ पालिकेबाहेर गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला
शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे म्हणाले की, मुख्याधिकारी यांनी आर्थिक लाभाच्या दृष्टीने आपल्याच मर्जीतील व्यक्तिला टेंडर (निविदा) मिळण्यासाठी आर.एम.सी.प्लांटच्या जाचक अटी टाकल्या. दिड कोटी पर्यंतच्या कामाला कोणत्याच प्लांटची आवश्यकता नसताना केवळ आपल्या मर्जीतील लोकांनाच टेंडर मिळावे या हेतूने व त्यामध्ये 15 किलोमीटर अंतराआतील प्लाँट असावा, अशी अट घालण्यात आली त्यामुळे खुली स्पर्धा होत नाही व त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. या अटींमुळे अन्य कोणाला टेंडर भरता येणे अशक्य असून या अटी रद्द होण्याची अपेक्षा धांडे यांनी व्यक्त केली आहे.
शहरात झालेली रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धत्तीने करण्यात आली आहे शिवाय शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी पाच कोटींचा ठेका देण्यात आला मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे. अनेक भागात दिवसा लाईट सुरू असतात आणि रात्री बंद असतात. साफसफाईबाबतही मोठ्या तक्रारी आहेत. नगरपालिकेचा सावळागोंधळ सुरू असून नागरीकांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप दीपक धांडे यांनी केला आहे. नगरपालिका प्रशासनाने सुविधा देण्यासह मालमत्ता कराची चुकीची आकारणी रद्द करून जनतेची लूट थांबवावी अन्यथा शिवसेना ठाकरे गट आपल्या पद्धतीने जन आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, दिलीप सुरवाडे, पप्पू बारसे, स्वप्नील सावळे, सोनी ठाकूर, नरेंद्र लोखंडे, मनोज पवार, महमूद शेख, संदीप पाटील, सुरज पाटील, बबलू धनगर, पवन नाले, चेतन भोई, पिंटू भोई, रींकू भोई, नबी पटेल, अमजद खान, नामदेव बारहाते, रहिम गवळी, प्रमोद राऊत, शरद जयस्वाल, शरद जोहरे, शिवसैनिक उपस्थित होते. रााष्ट्रवादीचे उल्हास पगारे, युवराज पाटील, अमोल इंगळे, संदेश सुरवाडे, राहुल बोरसे, दीपक दीपके, सफाई कामगार संघटना, शेख पापा शेख कालू यांनी उपोषणाला पाठिंबा दिला.



