भुसावळ : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (५३, रा.महात्मा फुले नगर) यांचा दसर्याच्या दिवशी मंगळवारी डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला होता. ही घटना गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. खून प्रकरणी आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . यामध्ये साजीद यास अटक करण्यात आली होती. संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील गवळीवाडा भागातील दस्तगीर गफूर खाटीक यांची १९९९ मध्ये दिलीप जोनवालसह अन्य संशयीतांनी हत्या केली होती. वडिलांची हत्या केल्याचा राग संशयित आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) सह पुतण्या साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांच्या डोक्यात असल्याने त्यांनी दसर्याच्या दिवशी मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल हे अकलूद येथून जेवण करून गरूड प्लॉट भागात येताच त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने जोनवाल यांचा मृत्यू ओढवला होता. यावेळी झालेल्या झटापटीत चाकू आदिल यास लागल्याने तो जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्यास निगराणीत खाजगी रुग्णालयात दाखल केले तर दुसरा संशयित साजीद सगीर खाटीक यास अटक केली. संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 1 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.



