वरणगांव

तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत उंटांची अवैध तस्करी होत असल्याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसुळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी हतनूरच्या निर्मनुष्य रस्त्यावर तपासणी पोलीस चौकी उभी केली होती.
बुधवारी रात्री ११ च्या सुमारास या भागातून एक आयशर ट्रक क्र.सी.जी ०४-एन.एस.२००५ हा जात असताना पोलिसांनी संशयावरून त्यास अडवून तपासणी केली असता या आयशर ट्रक मध्ये बारा उंट आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
यापैकी एक उंट या ट्रकमध्येच मृत अवस्थेत आढळून आला उंट वाहतूक करणारा ट्रक राजस्थान मधून मध्यप्रदेश मार्गे मालेगाव येथे जात असल्याचे ट्रकचालकाने पोलिसांना सांगितले आहे .
ट्रक चालकाचे नाव ,संतोष भगिरथ वर्मा वय ५३ , मुकेश नायर व क्लीनर कातिर्क वर्मा हे तिघेही रा. मध्य प्रदेशातील आहेत .
या उंटांना नाक ,तोंड व पाठीला दोरीने बांधून ठेवलेले होते. जेणेकरून त्यांच्या आवाज होणार नाही व बाहेर कोणाला कळणारही नाही. या उंटांचा रात्रीच पंचनामा करून त्यातील इतर उंटांना दुखापत होऊ नये म्हणून वरणगाव पोलिसांनी ऊंटांना जळगाव बाफना गोशाळेत रवाना केली आहे.
या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला आहे. गुरांच्या डॉक्टरांकडून मृत उंटाची तपासणी करण्यात आली आहे.यापूर्वी गाई, म्हशी, बकऱ्या, शेळ्या व गाढवा यांची अवैध वाहतूक पाहिलेली आहे मात्र, उंटांची तस्करी करण्याचा हा प्रकार जळगाव जिल्ह्यात प्रथमच वरणगाव येथे उघडकीस आला आहे. मालेगाव येथे हे उंट कोणाकडे व कशासाठी जात होते ? या उंटांचा मूळ मालक कोण ? याचा तपास वरणगाव पोलीस घेत आहेत.
उंटांची तस्करी प्रकरणामुळे अनेक संशय बळावलेले आहेत व परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोहे कॉ प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस ठाण्यात प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक करणे या कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहेत.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पो हे कॉ प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून भा द वी कलम ४२९ सह प्राण्याना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम कायदा कलम ११ ( १ ) , ( घ ) , ( च ) , ( ज ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप निरिक्षक शे इस्माईल शेख हे करीत आहे
दरम्यान बारा उंटातील अंदाजे दोन वर्षाचा एक उंट मृत अवस्थेत गाडीत आढळला तर अकरा उंटाची वैद्यकिय अधिकारी डॉ तायडे यांनी तपासणी करून त्यांना जळगाव येथील बाफना गो शाळेत संगोपनासाठी पाठविण्यात आले आहे


