भुसावळ : भुसावळसह परीसराला शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीकांमध्ये भीती पसरली असतानाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परीषद घेवून नागरीकांना शांतता राखण्यासह कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मित्तल म्हणाले की, भूकंपाची रीस्टर स्केलवर 3.3 इतकी नोंद नाशिकच्या मेरी संस्थेने केली आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून आरोग्य विभागासह अग्निशमन दलालाही तैनात राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्याने शहरातील तसेच परीसरातील धोकेदायक इमारतींना प्रशासनाकडून तातडीने नोटीसा बजावण्यात येत असून इमारती खाली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे, साकरी, खडके, किन्ही, शिंदी, कंडारी, फेकरी, निंभोरा, सतारे, कुर्हे, गोजोरे, वराडसीम, कन्हाळे बु.॥ तसेच भुसावळ शहरातील समता नगर, मरीमाता पूल, सुरभी नगर, पोफेसर कॉलनी, संतोषी माता हॉल परीसर, प्रल्हाद नगर, गांधी नगर, मामाजी टॉकीज, तुकाराम नगर, माऊली नगर, तापी नगर, हनुमान नगर, एकनाथ नगर, मार्केट परीसर, ग्रीन पार्क भागात भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले.



