भुसावळ : भुसावळकरांनी यापूर्वीही भूकंपाचे हादरे अनुभवले असलेतरी शुक्रवारच्या भूकंपाने मात्र भुसावळकरांची भरदिवसाही झोप उडवली. विशेष म्हणजे शुक्रवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्यानेच दुपारनंतर आणखीन भूकंपाचे धक्के बसतील ही अनामिक भीती भुसावळकरांच्या मनात असल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जनजीवनावरही परीणाम दिसून आला. सकाळ सत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भूकंपाचे हादरे बसताच शाळा सोडण्यात आल्या तर अन्य शाळांनी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात बसण्याच्या सूचना केल्या तर दुपार सत्रात बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल, के.नारखेडे विद्यालय यासह अन्य शाळांमध्ये शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता वर्गात शिक्षक शिकवत असतानाच जमिनीला व इमारतीला 3 ते 5 सेकंदापर्यंत हादरे बसताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. शिक्षकांनी भूकंपाची स्थिती लक्षात घेता तातडीने वर्गांमध्ये सूचना देवून विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानावर बसण्याच्या सूचना केल्या तसेच ताप्ती स्कूलमध्ये पालकांसह रीक्षा चालक व स्कूल बस चालकांना माहिती देण्यात आल्यानंतर पाल्यांना नेण्याचे आवाहन करण्यात आले तर के.नारखेडेतही विद्यार्थ्यांची सुटी करण्यात आली मात्र दुपारनंतर शाळा असूनही विद्यार्थी फिरकलेच नाहीत. भुसावळ तालुक्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या 65 जिल्हा परीषदेच्या शाळा असून ग्रामीण भागात मात्र शाळा सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते.
अनेक घरांमध्ये पडले भांडे : इमारती हादरल्या
भुसावळातील कस्तुरीनगर , वि.म.वार्ड , आनंद नगर, बिलली कॉलनीत नागरीकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले तर कंडारी, राहुल नगर भागातील घरांमध्ये रॅकमधील भांडे खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे तीन ते पाच सेकंदांपर्यंत नागरीकांनी हे धक्के अनुभवले तर भीतीपोटी अनेकांचा थरकाप उडाल्यानंतर उंच बिल्डींगमधूनही नागरीकांनी मोकळ्या जागी अप्रिय घटना टळण्यासाठी धाव घेतल्याचे दिसून आले.
इमारत हादरली ः अॅड.नितीन खरे
29 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत आलेल्या भूकंपानंतर भुसावळात त्याकाळी काही ठिकाणी घरांना तडे गेले होते मात्र शुक्रवारी भुसावळला बसलेल्या भूकंपाचे हादरे वेगळे होते व त्याची आजची तीव्रता जास्त असून त्याचा आज अनुभव घेतला आहे. सकाळी 10.35 वाजता इमारत हादरताच घराबाहेर पडलो, असे सरकारी वकील अॅड.नितीन खरे म्हणाले.
इलेक्ट्रिक पोल पडतोय असा भास झाला – सौ सायली लोकेश ढाके
सकाळी १०.३३ च्या सुमारास अचानक काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज झाला व दुकाना समोरील इलेक्ट्रिक पोल पडतोय की क़ाय असा भास झाला तसेच ज्या पायरिवर उभी होते ती सुद्धा हलल्याची जाणीव झाल्याने काही क्षण भीती वाटल्याचा अनुभव विठ्ठल मंदिर भागातील रहिवासी सौ सायली लोकेश ढाके यांनी सांगीतला .
घरात काम करीत होते आणि अचानक बॉम्ब फुटल्याचा आवाज येतो तसा आवाज आला आणि घर हादरले बाहेर काही तरी पडले अशी भीती वाटल्याची प्रतिक्रिया सौ दिपाली बोके यांनी दिली .


