साकेगाव येथे बंद घरे फोडून ७९ हजारांचा मुद्देमाल लंपास


भुसावळ – तालुक्यातील साकेगाव शिवारातील दोन बंद घरांमधून चोरट्यांनी ७९ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
साकेगाव शिवारातील खालसा हॉटेल मागील गट क्रमांक २३३ अ मध्ये पीतांबर सुकलाल हिवरकर हे वास्तव्यास आहेत. हिवरकर घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी १ ते २ जानेवारीदरम्यान घरातून ३५ हजारांची रोकड, २४ हजारांचे सोने-चांदीचे दागिणे, ७ हजार रुपये किंमतीचे २ मोबाइल लांबवले. समाधान कुंभार यांच्या घरातून ९ हजारांची रोकड, दोन हजारांच्या चांदीच्या पाटल्या, दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ७९ हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत हिवरकर यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई करत आहेत.