शिवसेनेचे ५० हजार सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प….शिवसेना बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार :


भुसावळ –
शिवसेनेचे लाखो सदस्य आहेत. पक्षाची स्वतंत्र घटना व कार्यप्रणाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच संघटनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे, हे दाखवण्याची आज वेळ आली असल्याचे नुकत्याच झालेल्या शिवसेना जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार पदाधिकाऱ्यांमधून प्रतिज्ञापत्र सादर करा. शिवाय पक्षाने ऑफलाईन सदस्य नोंदणी सुरू केली आहे. प्रत्येक गावातील पक्षाचा गट प्रमुख, गणप्रमुख, उपगणप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, उपशहरप्रमुख संघटक, सरपंच, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करा अश्या सूचना त्यांनी दिल्या.
उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, डॉ.मनोहर पाटील, प्रा.उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, अँड. मनोहर खैरनार, एलियास शेख व रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी रावेर लोकसभेतील शिवसेना पदाधिकारी बांधील असल्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी फॉर्म भरून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून संघटनात्मक बांधणी मजबूत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला ५० लाख सभासद नोंदणीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकसभा क्षेत्रात ५० हजार नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प जाहीर केला.