भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे गावातील सीमा गोकुळ पारधी (26) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. विवाहिता अशिक्षीत आहे, गावंढळ आहे, असे सातत्याने टोमणे मारून तसेच माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून पतीसह सासु छळ करीत असल्याने त्यास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेचे वडील गजानन फाल्गुन पारधी (कुसुंबा, जि.जळगाव) यांनी केल्यानंतर दोघा आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. एस.टी.चालक असलेल्या आरोपी पतीला अटक करण्यात आली.

छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या
कुसूंबा, जि.जळगाव येथील रहिवासी गजानन पारधी यांची कन्या सीमा हिचा कुर्हेपानाचे येथील रहिवासी व भुसावळ आगारातील एस.टी.चालक गोकुळ पारधी यांच्याशी सुमारे नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पारधी दाम्पत्याला विवाहानंतर पायल (6) व राधिका (3) या दोन मुली आहेत मात्र विवाहिता सीमा यांचे शिक्षण कमी झाले आहे, ती गावंढळ आहे, तिच्या आई-वडिलांची संबंध ठेवण्याची लायकी नाही म्हणून तिचा सासरी छळ करण्यात आला तसेच घर बांधण्यासाठी दोन लाख आणावेत म्हणून तगादाही लावण्यात आला व या छळाला कंटाळून सीमा पारधी या विवाहितेने गुरुवार, 14 रोजी रात्री गळफास घेतला, अशी तक्रार गजानन पारधी (कुसुंबा, जि.जळगाव) यांनी शनिवारी रात्री तालुका पोलिसात नोंदवल्याने आरोपी पती गोकुळ वसंत पारधी व सासु शोभाबाई वसंत पारधी (कुर्हेपानाचे, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री आरोपी पती गोकुळ पारधी यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत


