नंदुरबार – गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील दारूची तस्करी ही गुजरात राज्यात होत असल्याच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक यांना प्राप्त झालेल्या तक्रारीवरून त्यांनी नंदुरबार जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध दारुची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.दि.०१/०७/२०२२ रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना ” एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक हा साक्रीकडून गुजरात राज्यात अवैध दारु घेवून जाणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सदर वाहनाची माहिती घेवून तसेच बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर हे स्वतः स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, पोना/ दादाभाई मासुळ, पोना/ जितेंद्र ठाकुर, पोना/ जितेंद्र तोरवणे, पोना/ तुषार पाटील, पोकॉ/राजेंद्र काटके, पोकॉ/ आनंदा मराठे अशांना घेवुन दारुची तस्करी करणा-या वाहनावर कारवाई करण्यास रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार येथून विसरवाडी येथे जावून नागपुर सुरत या राष्ट्रीय महामार्गवर असणाऱ्या अँपल हॉटेलजवळ सापळा लावला. तसेच गोपनीय बातमीदार यांच्या संपर्कात राहुन सदरचा ट्रक येण्याची वाट पाहत राहिले. गोपनीय बातमीदार याने दारुची वाहतुक करीत असलेला एक लाल रंगाचा अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक क्रमांक जी.जे.०६ ए. झेङ ३५६० हा साक्रीकडून येत असल्याचे सांगितले. सदर ट्रकला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी अँपल हॉटेल जवळ इशारा देवून थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकास संशय आला. त्याने पोलीसांपासुन काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला.त्याचा पोलीस पथकाने पाठलाग केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला, पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात बेकायदेशिर वाहतुक करीत असलेली दारु मिळून आली.सदर दारुची पोलीसांनी मोजणी केली असता, त्यात ३,६०,०००/ रुपये किंमतीचे रॉयल क्लासिको व्हिस्कीचे ७५० एमएलच्या ६० खोके, २५,१७,१२०/- रुपये किमंतीच्या रॉयल ब्ल्यु व्हिस्कीच्या १८० एमएलच्या ५१८ खोके मिळून आले. २८,७७,१२०/- रुपये किमंतीची विदेशी दारू व १५,००,०००/- रुपये किंमतीचा अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक असा एकुण ४३, ७७, १९२० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांना आढळुन आला. सदरचा मुद्देमाल पोलीसांनी कायदेशिर प्रक्रिया करुन जप्त केला. तसेच पोलीसांनी वाहनाबाबत माहिती घेतली असता, ते वाहन देखील प्रथमदर्शी चोरी केल्याचे आढळुन आले आहे. याबाबत पोलीसांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोना/दादाभाई मासुळ, पोना/जितेंद्र ठाकुर, पोना/ जितेंद्र तोरवणे, पोना/तुषार पाटील, पोकों/राजेंद्र काटके, पोकों/ आनंदा मराठे यांनी केली आहे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले असुन दारुच्या मुळ मालकाचा शोध लावण्याचे देखील पोलीसांना आदेशीत केले आहे.


