जळगाव :शिवसंपर्क अभियानाची भव्य सुरुवात पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.ना.उद्धव ठाकरे यांनी दि. 14 मे 2022 रोजी बीकेसी मुंबई येथे झालेल्या ऐतिहासिक सभेद्वारे केली. तत्पश्चात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाचे पर्व सुरु झाले. याचअनुषंगाने आपल्या जळगाव शहरातही शिवसंपर्क अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार, दि. 27 मे 2022 रोजी शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आले आहे.

*शिवसंपर्क अभियानांतर्गत शुक्रवार, दि. 27 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता गोलाणी मार्केट परिसरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर सकाळी 11 वाजता मेहरुण परिसरातील साईबाबा मंदिर येथे सभासद नोंदणी अभियान राबविले जाईल. सकाळी 11.15 वाजता शहरातील एमआयडीसी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कष्टकरी हमाल बांधवांना गमछा वाटप होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता खान्देश सेंट्रल येथील आयनॉक्स थिएटरला महिलांना ‘धर्मवीर’ हा चित्रपट दाखविला जाईल. सायंकाळी 5 वाजता मेहरुण परिसरातील मास्टर कॉलनी व सुप्रिम कॉलनी येथे शाखेचे उद्घाटन होईल. तद्नंतर सायंकाळी 6 वाजता शहरातील महाबळ कॉलनी येथे शिवसेनेतर्फे ‘ऑक्सिजन किटस्’चे वाटप होईल. सायंकाळी 7 वाजता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे ‘शिवसेनेचा पक्ष मेळावा’ आयोजिलेला असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने पक्षप्रवेशही नियोजित आहे.
या शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून आज दि. 26 मे 2022 रोजी शिवसेना नेत्यांचे शहरात आगमनाला सुरुवात झाली असून शिवसंपर्क अभियानासाठी सुवर्ण नगरीत आलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत! याअनुषंगाने जळगावचा सर्वांगीण विकास, पक्षसंघटन, वर्तमान व भविष्याचा वेध घेत कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे मार्गदर्शन शिवसेना नेते व पदाधिकार्यांकडून नक्कीच होईल, हा सार्थ विश्वास आहे.


