रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान भोंगा, लाउड स्पीकर वापरता येणार नाही – डीवायएसपी वाघचौरे

भुसावळ – मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगे किंवा ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. ही परवानगी असली तरीही रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान भोंगा वा लाउड स्पीकर वापरता येणार नाही, अशा सूचना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिल्या शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलमध्ये मुस्लिम समुदायाची बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड , तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन उपस्थित होते . सोबतच बैठकीस शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख , फिरोज शेख , निसार शेख इम्तियाज़ शेख , माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू , शेख साबीर यांच्यासह मुस्लीम धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी या बैठकीत मंदिर, मशीद वा अन्य प्रार्थना स्थळांवर भोंगा, लाउडस्पीकर लावण्यासाठी तसेच सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान त्याचा वापर करावयाचा झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी मिळाल्यानंतरही रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान लाउड स्पीकरचा वापर करता येणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या आदेशाची माहिती दिली. बैठकीला उपस्थितांनी दोन दिवसानंतर या नियमांचे पालन करण्याची ग्वाही दिली.