भुसावळ – समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत म्हणजे महात्मा जोतिबा फुले. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, .अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ओबीसी समाज युवा नेते शिशिर जावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे कडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सरकारनेही 2016 मध्ये तशी शिफारस केंद्राकडे केली होती.
1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका (मरणोत्तर), नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला.
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. समाजासाठी खूप मोठं काम करणारे हे फुले दाम्पत्य अद्यापही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं नाही.
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक कार्याने देशातील प्रागतिक सामाजिक परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट केल्या आहेत. तसेच स्त्री-पुरुष समतेचा पाया घातला आहे. सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीतील फुले दाम्पत्य आघाडीचे नायक आहेत. त्यांचा गौरव म्हणजे फक्त महाराष्ट्राचा गौरव नसून तो संबंध देशाचा ठरेल. त्यामुळे फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा गौरव करणं हे आपल आद्य कर्तव्य असल्यामुळे भारत सरकाने त्वरित फुले दांपत्यास भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन समस्त भारतीयांना उपकृत करावे अशी मागणीसामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी समाज युवा नेते शिशिर जावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे कडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे..



