भुसावळ : शहरातील संत तोताराम महाराज नवयुवक मंडळाच्या सभागृह नियोजित जागेवर रविवार, 21 नोव्हेंबर रोजी लेवा समाजातील युवकांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यवसाय व शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही, असे एकमत तरुणांचे झाले. ज्या समाजात व्यवसायाला प्राधान्य दिले जाते तो समाज आर्थिक प्रगत होतो म्हणून व्यावसायिक प्रगतीसाठी विविध आराखडे यावेळी चर्चेतून आखण्यात आले .

नेतृत्वाशिवाय झाली बैठक
या बैठकीचे विशेष म्हणजे कोणाच्याही नेतृत्वाशिवाय तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन मीटिंग तथा बैठक घेतली. सर्वप्रथम गुरूवर्य वै.ह.भ.प. संत झेंडुजी महाराज बेळिकर व वै.ह.भ.प.संत तोताराम महाराज गाडेगावकर यांच्या प्रतिमेला सामूहिक माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यात समाजातील तरुणांना तंत्रज्ञानाबाबतीत अपडेट तथा अद्यावत करणे, त्यासाठी कार्यशाळा घेणे, समाजाचे अॅप बनविणे, करीअर गाईड, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन, व्यापार आणि व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आणि मेळावा, समाजाची सूची आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी समाजातून दरमहा सामूहिक वर्गणी गोळा केली जाईल. ज्या समाजबांधवाकडे दुःखद घटना घडेल, त्या बांधवाकडिल पहिल्या दिवसाचा खर्च या सामूहिक वर्गणीतुन करणार असल्याचा मानस जळगाव येथील युवकांनी व्यक्त केला.
विविध विषयांवर झाली चर्चा
सध्या सर्वत्र कळीचा मुद्दा बनलेल्या विवाह समस्येवर चर्चा करण्यात येउन आपण समाजाशी जुळून रहावे, पूर्वजांसह संताची शिकवण आणि परंपरा आपल्या पुढच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करणे, बेळीमठ, आळंदी येथील मठ, त्र्यंबकेश्वर येथील जागेसहयेथील स्थितीचाही आढावा याप्रसंगी घेण्यात आला. विवाह समस्या वाढत असून ही समस्या सोडवावी लागणार आहे, विवाह जोडतांना समाजाला प्राधान्य द्यावे, असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले. समाजबांधवांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय परस्पर घेउ नयेत. परस्पर निर्णय घेणार्यानी समाज मंडळाची पदे त्यागावी, असेही चर्चेत मुद्दे समोर आले. बैठकीला भुसावळ , अंबरनाथ , चितोडे , इंदूर, पुणे, जळगाव, नेरी आदी ठिकाणचे समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


