भुसावळ (प्रतिनिधी) : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांना नियुक्त केलेले असतानाच, आता पुन्हा 'बीएलओ सहायक' म्हणून शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याचा थेट फटका शाळांमधील अध्यापन कार्याला बसत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) या नियुक्त्या त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी भुसावळच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावल तालुक्यातही असाच विरोधाचा सूर उमटला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, ज्या शिक्षकांकडे आधीच जनगणनेची कामे सोपवण्यात आली आहेत, त्यांनाच आता बीएलओ सहायकाचे जास्तीचे ओझे देण्यात आले आहे. सध्या शाळांमधील ९० टक्के शिक्षकांची नियुक्ती या कामांसाठी झाल्यामुळे वर्गातील अध्यापन कार्य ठप्प झाले आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे. याप्रसंगी गोपाळ पाटील, शैलेंद्र महाजन, जे. पी. सपकाळे, आर. आर. धनगर, डॉ. प्रदीप साखरे, वैशाली महाजन-झोपे, हेमंत चौधरी, तुकाराम सोनवणे, ललित फेगडे, राहुल पाटील, वाय. एन. झोपे, गजानन ढाके, एस. एम. पाटील, बाळू गायकवाड, मुकेश इंगळे, पी. एन. करनकाळ यांचा समावेश होता.


