सलग दोन खून प्रकरणांनंतर रेल्वे, लोहमार्ग व स्थानिक पोलिसांची समन्वय बैठक; सराईत आरोपींवर विशेष मोहीम राबविणार : भुसावळ (प्रतिनिधी): रेल्वे भंगार चोरीच्या अवैध धंद्यामुळे भुसावळ शहर व रेल्वे परिसरात घडलेल्या सलग दोन खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. रेल्वे भंगार चोरीला कायमचा आळा घालण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात रेल्वे सुरक्षा दल (RPF), लोहमार्ग पोलिस (GRP) आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भंगार चोरीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस रेल्वे सुरक्षा दल (मुख्य, यार्ड व लोको), लोहमार्ग पोलिस तसेच भुसावळ शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सूरज धायेकर यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सहभागी झाले. बैठकीत प्रत्येक पोलिस ठाण्याला सन २०२० पासून आजपर्यंत रेल्वे भंगार चोरी करणारे आरोपी, सराईत गुन्हेगार तसेच प्रमुख भंगार व्यावसायिकांची अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. अवैध भंगार खरेदी-विक्रीवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले. अधिकृत पत्रानुसार, रेल्वेच्या भंगार साठ्याच्या चोरीमुळे केवळ मालमत्तेचे नुकसान होत नसून, या अवैध धंद्यातील वर्चस्वाच्या वादातून दोन खून झाल्याने व्यक्तीविरुद्ध व मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याची नोंद घेण्यात आली. बैठकीत सराईत आरोपींची माहिती एकमेकांशी सामायिक करणे, संशयितांवर संयुक्त धाडी टाकणे, अवैध भंगार खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सलग दोन खून प्रकरणांनंतर पोलिसांनी उचललेले हे पाऊल भंगार चोरीच्या अवैध जाळ्यावर मोठा प्रहार मानला जात आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त कारवाईची दिशा निश्चित झाल्याने भंगार चोर व त्यांच्या साथीदारांविरोधात व्यापक मोहीम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "रेल्वे हद्दीत भंगार चोरीच्या प्रकारातून गेल्या काही दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा पोलिस रेकॉर्ड मागविण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नियोजन करण्यात आले आहे." — केदार बारबोले, पोलिस उपअधीक्षक, भुसावळ


